सांगली : तासगाव-मणेराजुरी मार्गावर तिहेरी अपघात झाला. या घटनेत २० जण जखमी झाले आहेत. एसटी, डंपर आणि ओमनी व्हॅन या वाहनांमध्ये हा अपघात झाला.
हेही वाचा - मंत्री जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात खा.शेट्टी, खा.पाटील यानी विरोधकांचा घेतला चिमटा
सांगलीच्या तासगाव-मणेराजुरी मार्गावर दुपारी एसटी, मुरूम वाहतूक करणारा डंपर व ओमनी यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटीमधील चालकासह 19 प्रवासी जखमी झाले आहेत. तासगाव मणेराजुरी मार्गावरून तासगावच्या दिशेने एसटी बस निघाली होती. वासुबे फाटा येथे बस थांब्यावर प्रवासी उतरण्यासाठी बस थांबली होती. याचवेळी समोरून ओमनी येत होती, तर मणेराजुरीच्या दिशेने डंपर जात होता. यावेळी ओमनी बसला 'ओव्हरटेक' करून पुढे जात असताना समोरून डंपर येत होता. आपल्या मार्गावर आलेल्या ओमनीला वाचवण्याच्या नादात भरधाव डंपरचे नियंत्रण सुटल्याने तो थेट बसवर जाऊन आदळला. धडक इतकी जोरदार होती की एसटीच्या समोरील भाग व काचांचा चक्काचूर झाला.
हेही वाचा - मनात जिद्द असेल तर वयाची अडचण येत नाही! ८२ वर्षांच्या आजोबांची 'सांगली ते नांदेड' सायकलवारी
या धडकेत चालकासह अनेक प्रवाशांच्या पायाला, डोक्याला, हनुवटीला, गुडघ्याला, पोट यासह अन्य ठिकाणी मार लागला. जखमींना तत्काळ तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.