सांगली - पलूसच्या इंगळे पाझर तलावमध्ये अचानकपणे हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अज्ञातांनी पाण्यात विषारी पदार्थ टाकल्याने पाणी दूषीत होऊन हे मासे मृत झाल्याचा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
पलूस शहरानजीक असणाऱ्या सांगली जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या इंगळे पाझर तलावात अचानकपणे मासे मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार समोर आला आहे. पलूस परिसरातील विहिरींची जलपातळी वाढावी यासाठी उन्हाळ्यात पलूस नगरपरिषदेकडून आरफळचे पाणी पवार पाझर तलावातून या इंगळे पाझर तलावात घेतले जाते. सध्या या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मात्र, या तलावात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मासेमारीसाठी विषारी पदार्थ टाकला आहे. या विषारी पदार्थामुळे पाणी दूषीत होऊन तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे तलावाच्या काठाला मृत माशांचा खच साठला आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. मृत माशांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
इतर वन्यप्राण्यांनाही धोका -
या तलावाचा वापर आसपासच्या परिसरातील मेंढपाळ व ग्रामस्थ जनावरांना पाणी पाजण्यासाठी करतात. या परिसरात अनेक स्थानिक पक्षांसह तुतवार, धोबी, चिखल्या अशा हिमालयीन पक्षांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. विषारी पाण्यामुळे सर्व पशू-पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याची पलूस जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेने गंभीर दखल घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.