सांगली - सोनसाखळी चोरणाऱ्या एका चोराला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४२ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा चोर इराणी असल्याचे सांगण्यात येत आहे. गुंडाविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
मिरज शहरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मंगळवारी एका संशयित व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली.
त्यानुसार मिरजेतील सह्याद्रीनगर येथून हबीबअली इराणी याला अटक करण्यात आली. त्याची अधिक चौकशी केली असता, दोन महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली त्याने दिली. हबीबअली याच्याकडून एक मंगळसूत्र, एक चेन असे सव्वा लाख किंमतीचे ४२ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केली.