सांगली - ११ नोव्हेंबर १९२० हा दिवस सांगलीच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने कोरला गेला आहे. याच दिवशी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने सांगलीची भूमी पावन झाली होती.
गांधीजींच्या हस्ते कोनशीला रचलेले भारतातील एकमेव सार्वजनिक ग्रंथालय... स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या आंदोलनाला सांगलीतील लोकांकडून, विशेषतः व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत होता. गांधीजींच्या विचारांचा प्रसार होऊन, लोकांना त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन एक छोटेखानी वाचनालय देखील सुरु केले होते.१९२० साली एका सभेच्या निमित्ताने महात्मा गांधी सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्याचेच औचित्य साधून, ग्रंथालयाच्या तत्कालीन विश्वस्तांनी महात्मा गांधींची भेट घेऊन, त्यांना या ग्रंथालयाच्या सुरु असलेल्या बांधकामाच्या कोनशिलेचे अनावरण करण्याची विनंती केली. बापूंनी ती लागलीच मान्य केली.या इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर विश्वस्त मंडळाच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे, गांधीजींच्या हस्ते कोनशीला रचलेले हे भारतातील एकमेव ग्रंथालय आहे. त्यामुळे या वाचनालयाला महात्मा गांधीजींचे नाव देण्याचा एकमताने ठराव झाला. त्यानंतर, 'ज्ञान प्रसारक मंडळ' वाचनालयाचे 'महात्मा गांधीजी सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय' असे नामकरण करण्यात आले.
हेही वाचा : माझ्या आजोबांच्या अस्थी तरी द्या; गांधीजींचे पणतू तुषार गांधीची मागणी