सांगली - आईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर एका व्यक्तीने इतर रुग्णांना वेळेत उपचार मिळावे, या उद्देशाने कोरोना रुग्णालय सुरू केले आहे. मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते शकील पिरजादे यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आईच्या स्मरणार्थ ना नफा ना तोटा या तत्वावर 40 खाटांचे अद्यावत कोरोना सेंटर सुरू केले आहे.
तर ज्या गोरगरीब रुग्णांचे कसे होत, असेल याच्या जाणिवेतून शकील पिरजादे यांनी आपल्यावर आलेली वेळ सर्वसामान्य नागरिकांच्या वरही येऊ नये, या उद्देशाने आणि महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मिरजमध्ये 40 खाटांचे कोरोना रुग्णालय उभे केले आहे. हयात फाउंडेशन, जमियत दर्दमंदानी आणि अरफा हेल्थ केअर कोविड सेंटरच्या माध्यमातून हे ऑक्सिजनची व्यवस्था असलेले 40 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
सांगली महापालिकेने शकील पिरजादे यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना मिरजेच्या बाजार समितीमधील एक हॉल उपलब्ध करून दिला आणि त्या ठिकाणी आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह 40 खाटांचे रुग्णालय सुरू झालेले आहे. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते या कोरोना हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले. आज (दि. 23 सप्टें.) या ठिकाणी अनेक गरजूंना अल्प दरात उपचार मिळत आहेत. अनेक रुग्णांचे बेड मिळत नसल्याने जाणारे प्राण आणि त्यांच्या नातेवाईकांना होणार मनस्ताप थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - समस्त मुस्लिम समाजाकडून उभारण्यात येतोय कोरोना रुग्णालय, सर्व धर्मियांना मिळणार उपचार