सांगली - ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यामध्ये पडली आहे. मिरज तालुक्यातील वड्डी येथे सुरू असलेली ऊसतोड रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेकडून बंद पाडण्यात आली आहे. ऊसाला 4 हजार रुपये दर मिळावा आणि तेवढा दर मिळाल्याशिवाय तो चालू देणार नाही, अशी भूमिका घेत शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन केला आहे.
ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी
ऊसाचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र, अद्याप उसाचा एफआरपी जाहीर झाला नाही. पण, ऊस तोड सांगली जिल्ह्यात सुरू झालेली आहे. मिरज तालुक्यातल्या वड्डी या ठिकाणी शिवशक्ती कारखाना, रायबाग, कर्नाटक साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ऊसतोड शेतकरी संघटनेच्यावतीने बंद पाडण्यात आली आहे. उसाच्या फडात जाऊन रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेने ऊस तोडणी मजुरांना पिटाळून लावत सुरू असलेली ऊसतोड रोखली आहे. ऊसाला चार हजार रुपये प्रति टन भाव आणि एफआरपी जाहीर झाल्याशिवाय ऊस तोडणी सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा - मदतीची भीक नको... पूरग्रस्तांचे आघाडी सरकारविरोधात प्रतिकात्मक धनादेश आंदोलन