सांगली -अल्पवयीन सावत्र बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी सावत्र भावाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सांगली न्यायालयाने ठोठावली आहे. तोफिक मुल्ला (वय 24 वर्षे), असे या नराधमाचे नाव आहे. फेब्रुवारी, 2019 मध्ये खानापूर तालुक्यातील भाळवणीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला होता.
नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणी फेब्रुवारी 2019 मध्ये घडली होती. गावामध्ये एकत्र राहणाऱ्या एका कुटुंबातील तेरा वर्षीय अल्पवयीन असणाऱ्या आपल्या सावत्र बहिणीवर तौफिक उर्फ अमानुल्ला सलीम मुल्ला याने वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. पीडित मुलीला हा प्रकार कोणालाही सांगू नये यासाठी जीवे मारण्याची धमकीही नराधम तौफिकने दिली होती. मात्र, काही दिवसाने पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. त्यांनतर पीडित मुलीने तौफिकने वारंवार बलात्कार केल्याची माहिती नातेवाईकांना दिली.
त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये तौफिकच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी विटा पोलिसांनी तौफिक मुल्ला याला अटक करून त्याच्या विरोधात सांगली न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. सोमवारी या खटल्याची सुनावणी पार पडली आहे. ज्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी सांगली जिल्हा न्यायालयाने तौफिक मुल्ला याला प्राप्त पुराव्यांच्या आधारे दोषी ठरवत 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे वैशाली मुरकुटे यांनी या खटल्याचे काम पाहिले.
सरकारकडून नुकत्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी कायद्यात दुरुस्ती केली आहे. यामध्ये सोळा वर्षाखालील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यास कमीत कमी वीस वर्षे सक्तमजुरी शिक्षेची तरतूद 2018 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम 376 नुसार देण्यात आलेली ही पहिला शिक्षा आहे.
हेही वाचा - सांगलीत दलित महासंघाच्या वतीने नावेत बसून रस्ता दुरवस्थेविरोधात आंदोलन!