सांगली - महापालिका महापौर-उपमहापौर निवडनुकीमध्ये राष्ट्रवादी काँगेस आघाडीने भाजपाचा डाव पलटी केला आहे. भाजपाच्या सात नगरसेवकांना फोडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीत बाजी मारली आहे. लवकरचं भाजपाचे आणखी 10 नगरसेवक आघाडीत सामील होतील, असा विश्वास व्यक्त करत शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी -
सांगली महापालिकेच्या महापौर- उपमहापौर निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी हे महापौर तर काँग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर म्हणून विजयी झाले आहेत. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या नगरसेवकांची खबरदारी घेण्यासाठी नगरसेवकांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवले होते. या निवडीनंतर कोल्हापूरहून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट सांगली महापालिकेमध्ये प्रवेश केला, यावेळी महापौर आणि उपमहापौर यांच्यासह नेत्यांची गुलालाने उधळण करत जल्लोष साजरा केला आहे.
शहराचा विकास साधणार -
यावेळी नुतून महापौर दिग्विजय सूर्यवंशी सांगली महापालिकेच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये भाजपाच्या सत्ताधारी मंडळींनी कोणताच विकास केलेला नाही. निधी देण्यामध्ये राजकारण केले त्यामुळेच भाजपाचे नगरसेवक नाराज होते, आणि यातून आपला विजय झाला आहे. मात्र, यापुढील काळात आपण शहराच्या विकासासाठी जे रखडलेले प्रकल्प आहेत, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नुतून महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी 10 नाराज आघाडीत येणार -
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यावेळी म्हणाले, आमचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपणास करेक्ट कार्यक्रम करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे महापौर निवडीच्या निमित्ताने भाजपाचे जे नाराज नगरसेवक आहेत, त्यांनी आघाडी सोबत येण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस आघाडीच्या एकसंधपणा मुळे हा विजय झाला, असून भाजपाचे आणखी काही नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून लवकरच आघाडीचे संख्याबळ 45 पर्यंत जाईल, असा विश्वास बजाज यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस आक्रमकतेचा गुलाल -
महापालिकेत सत्तेत असताना भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनाही शहराच्या विकासासाठी निधी देण्यामध्ये राजकारण केले. इतकेच नव्हे तर भाजपच्या नगरसेवकांच्या बाबतीत यांनी दुजाभाव केला. त्यामुळे भाजपाचे नगरसेवक हे त्यांच्या कारभारावर नाराज होते. त्याचाच परिणाम या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आहे. भाजपाला जनतेचा कौल कळला नाही, विधानपरिषदेच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, नुकतंच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नाना पटोले यांनी स्वीकारल्यानंतर काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचाच पहिला गुलाल सांगली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला, असल्याची प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.