सांगली - सांगलीच्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठात 1971 च्या पाकिस्तान युद्धात सहभागी झालेला रणगाडा स्थापित करण्यात आला आहे. रशियन बनावटीचा वैशिष्टपूर्ण टी - 55 बॅटल टँक आता सांगलीकरांना शौर्यगाथा सांगणारा ठरणार आहे. तसेच, जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा रणगाडा, जो प्रत्यक्ष युद्धात सहभागी होता, तो आता जवळून सांगलीकरांना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - सांगलीचा पूर लागला ओसरू.. आता 'मिशन शहर स्वच्छ', सांगलीसह 5 पालिकांची स्वछता पथके ऑन फिल्ड
भारतीय सैन्य दलाची शान टी - 55 बॅटल टँक
1966 मध्ये भारतीय सैन्य दलात आलेला आणि त्यानंतर 1971 च्या पाकिस्तान युद्धात अनेक कामगिरींमध्ये सहभागी झालेला टी - 55 बॅटल टँक (रणगाडा) सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये स्थापित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शांतिनिकेतन लोकविद्यापीठचे संचालक गौतम पाटील, सेवानिवृत्त बिग्रेडियर सुधीर पाटील यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.
शौर्यगाथा सांगणारा रणगाडा
सदर टी - 55 बॅटल टँक 14 हॉर्स युनिटमध्ये कार्यरत होता, असे सेवानिवृत्त बिग्रेडियर सुधीर पाटील यांनी सांगितले. 1971 च्या पाकिस्तान युद्धामध्ये पश्चिम बॉर्डरवर 36 इन्फेन्टरी डिव्हीजनच्या 14 हॉर्स (सिंध हॉर्स) युनिटने 8 डिसेंबर 1971 रोजी शक्करगढच्या बाजूने चढाई केली होती. 10 डिसेंबर 1971 रोजी भारतीय सैन्याने शत्रूचे आठ टँक नष्ट केले होते. या युद्धात सिंध हॉर्सला एक महावीर चक्र, दोन वीर चक्र, एक सेना मेडल आणि चार मेनशन इन डिसपॅचेसने सन्मानित करण्यात आले होते. हा वैशिष्टपूर्ण टी - 55 बॅटल टँक आता शांतिनिकेतन लोकविद्यापीठात स्थापित झाला आहे. या रणगाड्याबद्दलची असणारी सर्व माहिती या ठिकाणी डिजिटल फलकाच्या माध्यमातून दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे, सांगलीकरांना ऐतिहासिक रणगाड्यामुळे शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - कोरोना, महापुराच्या दुहेरी संकटाबरोबर सांगलीकरांवर आता वीज तोडणीचा आसूड