सांगली - महाविकास आघाडीने विधानपरिषदेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांना दिलेल्या शब्दानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. राज्यात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक पार पडत आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती केली होती. ही युती करताना स्वाभिमानीला सत्तेत वाटा देण्याचे ठरले होते. यामध्ये मंत्रिपद, विधान परिषद आणि महामंडळ देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर कोणतेही सत्तेचे पद स्वाभिमानीच्या वाट्याला आले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बहुतांश जागा स्वाभिमानीमुळे निवडून आल्या आहेत. त्यामुळे सत्तेत सहभागी करून घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत ना मंत्रीपद, ना महामंडळ असा कोणताही सत्तेचा वाटा देण्यात आला नाही. त्यामुळे किमान विधान परिषदेची एक जागा देऊन स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
राजू शेट्टी हे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे. त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिल्यास शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हातभार लागणार आहे. त्याचबरोबर स्वाभिमानीला काही अंशी सत्तेत वाटाही मिळणार आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. तसेच भाजपला देशात विरोध करण्याची हिम्मत शेट्टी यांनी दाखविली होती आणि एनडीएमधून प्रथम स्वाभिमानी बाहेर पडली होती. या सर्व बाबींचा विचार करून त्यांना संधी द्यावी, अशी मागणी खराडे यांनी केली आहे.