सांगली - एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार मिरजमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीस अटकही करण्यात आली. मात्र पीडित मुलींचे संतप्त नातेवाईक आणि जमावाकडून संशयित आरोपीच्या घरावर दगडफेक करत तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे मिरजच्या बोकड चौक परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
12 वर्षीय मुलीवर बलात्कार -
मिरजेतील बोकड चौक याठिकाणी चिकन दुकान चालवणाऱ्या फय्याज कोकणे या तरुणाकडून एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. कोकणे याचे बोकड चौक याठिकाणी चिकनचे दुकान असून त्या दुकानात चिकन खरेदी करण्यासाठी बारा वर्षाची मुलगी वारंवार येत होती. यातून फय्याज याच्याशी ओळख झाली. काही दिवसांपूर्वी फय्याज कोकणे याने पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून मुलीला अश्लील चित्रफित दाखवून आणि गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित फैय्याज कोकणे याच्याविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांनतर पोलिसांनी कोकणे याला अटक केली आहे.
घरावर दगडफेक आणि तोडफोड -
दरम्यान बलात्काराची घटना समोर आल्याने बोकड चौक याठिकाणी सकाळपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आणि संतप्त जमावाने संशयित फैयाज कोकणे राहत असलेल्या बोकड चौक येथील घरावर हल्ला चढवत तुफान दगडफेक केली आहे. तसेच याठिकाणी जमावाकडून तोडफोड करण्यात आली. यानंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यापार्श्वभूमीवर परिसरामध्ये मिरज पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.