सांगली - मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात मराठा आरक्षण संघर्ष समिती आता आक्रमक झाली आहे. येत्या 25 जून रोजी मुंबईमध्ये राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेच्या माध्यमातून निर्णायक लढ्याची घोषणा होणार असल्याचे संघर्ष समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. समितीचे नेते सुरेश पाटील विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी आता निर्णायक लढा
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून चेष्टा सुरू असल्याचा आरोप मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समितीकडून करण्यात आला आहे. कोल्हापूर या ठिकाणी पहिल्यांदा घेतलेल्या गोलमेज परिषदेमध्ये मराठा आरक्षण आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीची 14 विषय मांडण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र राज्य सरकारकडून 8 विषयांना मंजुरी देत राज्यव्यापी आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ते आंदोलन स्थगित केले होते. मात्र राज्य सरकारकडून ज्या आठ ठरावांना मंजुरी करत मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याची अद्याप पूर्तता करण्यात आली नाही, असा आरोप मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समितिचे नेते सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक आणि वैभव शिंदे यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट सुद्धा काही कामाची नाही. राज्य सरकारकडून खालच्या पातळीवरून ज्या प्रक्रिया करायचे आहेत त्या होताना दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राज्यव्यापी गोलमेज परिषद
यामुळे आता सरकारच्या विरोधात निर्णयातील लढा उभारण्यासाठी नवी मुंबई या ठिकाणी येत्या 25 जून रोजी मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये राज्यातील तसेच केंद्रातील अनेक आजी-माजी मंत्री, मराठा समाजातले खासदार, आमदार, नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या गोलमेज परिषदेमध्ये राज्य सरकारची पोलखोल करण्यात येणार असून, या परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षण आणि सरकारच्या विरोधात निर्णयक लढ्याची घोषणा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मराठा आरक्षण समितीचे नेते सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक आणि वैभव शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे.
हेही वाचा - आघाडी सरकार नुसतेच पाच वर्षे टिकणार नाही, तर पुढील निवडणुकाही सोबत लढेल - शरद पवार