सांगली - मिरजेतून गोरखपूरकडे जाणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना महाराष्ट्रीयन पद्धतीने रवाना करण्यात आले आहे. हलगीच्या तालावर सांगली महापालिकेने मिरज स्थानकावरून परप्रांतीय कामगारांना रवाना केले आहे .लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अडकलेल्या परप्रांतीय मजूर, कामगारांना केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेद्वारे आप-आपल्या गावी पाठवण्यात येत आहे.
श्रमिक एक्स्प्रेसच्या माध्यमातून हे मजूर रवाना होत आहेत. मिरज रेल्वे स्थानकातून गुरुवारी आणखी एक श्रमिक रेल्वे धावली आहे. रात्री १० वाजता मिरजेतून ९०० हून अधिक कामगार मिरज - गोरखपूर या श्रमिक एक्स्प्रेसमधून रवाना झाले. यावेळी सांगली महापालिका प्रशासनाकडून या रवाना होणाऱ्या परप्रांतीय कामगारांना हलगीच्या निनादात निरोप देण्यात आला. यावेळी हलगीच्या निनादाने संपूर्ण मिरज स्टेशनचा परिसर दणाणून गेला होता. या निरोप प्रसंगी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होत्या. महापालिका प्रशासनाकडून या सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या.