सांगली - सांगली महापालिका क्षेत्रातील आणखी ६ जणांना कोरोना लागण झाली आहे. यामध्ये ५ जण मिरज शहरातील तर १ जण सांगली शहरातील आहे. पालिका प्रशासनाकडून कोरोना रुग्णांचा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. यापैकी ३ जण हे खासगी रुग्णालयाशी संबंधित आहे. महापालिका क्षेत्रात सोमवारी दिवसभरात ६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्यामुळे पालिका क्षेत्रात ४९ रुग्णांची नोंद झाली आहे.
सांगली मनपा क्षेत्रातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोमवारी दिवसभरात ६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मिरज शहरातील ५ आणि सांगली शहरातील १ अशा ६ जणांचा यामध्ये समावेश आहे. मिरजेतील आजच्या कोरोना रुग्णांपैकी २ जण हे एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी आहेत. या रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कर्नाटकच्या अथणीमधून उपचारासाठी एक रुग्ण दाखल झाला होता. त्याला कोरोना लागण झाल्यानंतर पालिका प्रशासनाने संपूर्ण रुग्णालय क्वारंटाईन करत सर्वांचे स्वॅब घेतले होते. ज्यामध्ये रुग्णालयातील दोन महिला कर्मचारी आणि मिरज तालुक्यातील २ रुग्ण अशा चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन कर्मचारी हे रेवणी गल्ली व वाळवे गल्ली येथील आहेत
भारतनगर शांतीसागर कॉलनी येथे परदेशातून आलेल्या व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मिरज शहरातील सुंदर नगर येथील एक व्यक्ती जी सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. त्याचा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. तसेच अमननगर येथील एका व्यक्तीला कोरोना लागण झाली आहे. त्यामुळे मिरज शहरातील ५ जणांना त्याच बरोबर सांगली शहरातील १०० फुटी परिसरातील रमामाता नगर येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
पालिका प्रशासनाने कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ३२ जणांना क्वारंटाईन केले आहे. तसेच संबंधित कोरोनाबाधित रुग्णांचा परिसर हा कंटेंटमेंट झोन जाहीर करत सील करण्यात आला आहे. तर सांगली महापालिका क्षेत्रात सोमवारी दिवसभरात ६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, यामुळे पालिका क्षेत्रात ४९ रुग्णांची नोंद झाली आहे.