सांगली - राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे. सोशल मिडीयातून अनेक कार्यकर्ते त्यांची मते व्यक्त करत आहेत. अशावेळी त्यांच्याशी हितगुज करणे आणि आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले. तसेच त्यासाठी खानापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा शनिवारी विटयात 4 जानेवारीला पंचफुला मंगल कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या मागील अडीच वर्षांसाठी आमची भाजप सोबत युती होती. आम्ही सत्तेतही सहभागी होतो. कोणतीही निवडणूक करायची म्हणजे त्यासाठी तयारी असावी. आता राज्यात महाविकास आघाडी तयार झाली आहे. जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडीने संपर्क साधला. त्यावेळी उशीर झाला होता. सदस्यच हातात राहीले नसतील तर निवडणूकीची भाषा करून काय उपयोग? असा सवालही त्यांनी केला. निवडणूक करायचीच होती तर 4 दिवस आधी ताकदीने गोळा बेरीज करावयास हवी होती. एका बाजूस भाजपाने जिल्हा परिषदेसाठी सदस्यांची बेरीज केले असताना महाविकास आघाडीने मात्र हालचाल केली नाही.
हेही वाचा - 'महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचायं'
निवडणूकीच्या आधीच्या संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याशी चर्चा सुरू केली. तोपर्यंत उशीर झाला होता. त्याहीपेक्षा आम्ही या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची यासाठी शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडे संपर्क साधला. मात्र, अखेरपर्यंत पक्षश्रेंष्ठींनीही कसलाही आदेश दिला नाही. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात जिल्हा परिषदेत भाजपशी युती असल्याने आणि ते आमचे नैसर्गिक मित्र असल्याने आम्ही त्यांना पाठींबा दिला. सत्तेसाठी जिल्हा परिषदेत युती केली नाही. पक्षाचा आदेशच नाही आणि भाजपाशी जिल्हा परिषदेत युती असल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्या सर्वांनी पाहिल्या आहेत. त्यानंतर नुकताच मंत्रीमंडळ विस्तार झाला. या सर्व परिस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमधे संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर व्हावा आणि आपल्याही भूमिकेत स्पष्टता निर्माण व्हावी. विधानसभा निवडणूकीत पक्षभेद विसरून काही लोकांनी मला मदत केली आहे. त्यांच्यापर्यंत देखील माझी भूमिका गेली पाहिजे. त्यासाठी शनिवारी दि. 4 जानेवारी रोजी हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'या' कंपनीला सुमारे १५ हजार कोटी भरण्याची दूरसंचार विभागाने दिली नोटीस
मेळाव्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता -
मेळाव्याचे निमित्त असले तरी राज्यमंत्रीमंडळातून अंतिम क्षणी वगळलेल्या आमदार बाबर यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्यात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदार बाबर हे धक्कातंत्र वापरून मोठा निर्णय घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. आमदार बाबर यांनी घडलेल्या राजकीय घडामोडीवर मंथन करण्यासाठी हा मेळावा बोलावला असल्याने कार्यकर्ते मोठया तीव्रतेने त्यांची मते मांडण्याची शक्यता आहे.
गेल्या 5 वर्षात आमदार बाबर यांनी केलेली विकासकामे आणि पक्षाने केलेले त्यांचे मूल्यमापन याबाबतही काही कार्यकर्ते सडेतोड भाष्य करू शकतात. राज्यमंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर राज्यभरात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांतून अनेक आमदार समर्थकांच्या तीव्र भावना उमटत असताना आमदार बाबर समर्थकांच्या या मेळाव्याला राजकीयदृष्टया विशेष महत्व प्राप्त होणार आहे. या मेळाव्यात आमदार बाबर धक्कातंत्र वापरून मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.