सांगली - जिल्हा परिषदेमध्ये प्रथमच शिवराज्याभिषेक दिन आज (रविवारी) साजरा करण्यात आला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपतींचा आदर्श ठेवून कारभाराचा ध्यास -
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आदर आणि छत्रपतींनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला, त्याचा आदर्श समजून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. तसेच गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करणारी राज्यातील सांगली जिल्हा परिषद पाहिलीच आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - 'भगवा झेंडा लावणे ही महाराष्ट्राची शान'
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन आज साजरा होत आहे. सांगलीमध्येही जिल्हा परिषदेच्यावतीने हा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आवारात विजयाची प्रतीक असणारी गुढी उभारून जिल्हा परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवाद करण्यात आले. राज्याचे जलसंपदा व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते यावेळी गुढीचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.