सांगली - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती व नोंदणी विधेयकाच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरणार आहे. 30 डिसेंबर रोजी सांगलीत या कायद्याच्या समर्थनात मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी जाहीर केले. तसेच हा कायदा देशाला लाभदायक असून आपला पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - यदा यदा ही मोदीस्य: मंदी भवती भारतं; श्लोकातून जयंत पाटलांचा मोदी सरकारला टोला
देशात सध्या राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विधेयकावरून रणकंदन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात या कायद्याला विरोध होत आहे, तर या कायद्याच्या समर्थनार्थ आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रस्त्यावर उतरणार आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी सांगलीमध्ये 30 डिसेंबर रोजी शिवप्रतिष्ठानकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आज सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्याचा चांगला निर्णय घेतला आहे, याला आमचा पाठिंबा आहे आणि देशाला हे लाभदायक आहे. मात्र, या कायद्याला विरोध होत आहे, हे देश विघातक असल्याचे मत व्यक्त करत या कायद्यावरून मुस्लीम लोक काही म्हणोत आणि त्यांच्याकडून राष्ट्रत्वासारखी कल्पना करणे चुकीचे आहे आणि हे दुर्दैवी आहे, असे मत भिडे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्री ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
भीमा कोरगाव दंगली प्रकरणी पुणे जिल्हा बंदीच्या नोटीसेबाबत बोलताना, पुणे जिल्हा बंदी ही शक्यच नाही आणि मला बदनाम करण्याचा हा उद्देश आहे. मला कुठलीही नोटीस मिळाली नाही, असे सांगत ज्यावेळेस घटना घडली, त्यावेळी मी राष्ट्रवादीचे सध्याचे मंत्री जयंत पाटील यांच्या मातोश्रींच्या दशक्रिया कार्यक्रमास गेलो होतो, हे उघड आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.