सांगली - माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील मुलाखती दरम्यान एक वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानकडून शुक्रवारी 'सांगली जिल्हा बंद'ची हाक देण्यात आली. या बंदला शिवसेनेकडून विरोध दर्शवण्यात आला. मात्र, प्रतिष्ठानच्या या सांगली बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा... फडणवीसांचे कार्यालय टेंडर घोटाळ्यांसाठीचा अड्डा होते; 'मेट्रो भवन टेंडर' घोटाळ्याची चौकशी व्हावी
पुण्यात खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी संजय राऊत यांनी उदयनराजे भोसलेंना उद्देशून 'त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे दाखवावे' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत आक्षेप घेत शिवप्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली.
संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याचा शिवप्रतिष्ठानकडून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शु्क्रवारी सांगली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी हे आवाहन केले. या आवाहनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सांगली शहरातील व्यापारपेठेत सकाळपासून बंद पाळण्यात आला. उपनगरात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा... 'शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो'
सांगली बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. उदयनराजेंच्या बाबत 'वादग्रस्त' वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा यापुढील काळात टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी दिला आहे.
शिवसेनेकडून बंदला विरोध...
दुसर्या बाजूला शहर शिवसेनेने मात्र या बंदला विरोध दर्शवला आहे, सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर या ठिकाणी आज शुक्रवारी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे त्यांचे आगमन जिल्ह्यात बंदने होत असल्याने शिवसेनेने या बंदला विरोध दर्शवला आहे. 'शिवप्रतिष्ठाने बंद मागे घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतचे निवेदन द्यावे',अशी विनंती शिवसेना शहरच्या वतीने शहरप्रमुख अनिल शेटे यांनी केली.