सांगली - मिरज शासकीय रुग्णालयातील 3 रुग्णांना रस्त्यावर फेकून देण्याची घटना घडली होती. याच्या निषेधार्थ शिवसेनेने आज आंदोलन केले. मिरजेच्या शासकीय रुग्णालयासमोर निदर्शने करत दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. तर याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमत, दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- कोल्हापुरात 7 दरवाजे तोडून सराफ दुकान फोडले; चोर सीसीटीव्हीत कैद
काय आहे नेमक प्रकरण-
मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 3 वृद्ध रुग्णांना 2 नोव्हेंबरला दुसऱ्या दवाखान्यात दाखल करण्याचा नावाखाली डिस्चार्ज करण्यात आला. त्यानंतर त्यांना शहरातील एका निर्जन रस्त्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर अत्यावस्थेत असणाऱ्या या रुग्णांना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर आणि सावली निवारा केंद्राचे मुस्तफा यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, यामधील शिवलिंग कुचनुरे यांचा सोमवारी मृत्यू झाला. यानंतर शिवसेनेने मिरज शासकीय रुग्णालयाचा हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला होता. तर आज या प्रकरणी शिवसेनेने मिरज शासकीय रुग्णालयाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले आहे. रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने करत रुग्णालय प्रशासनाचा निषेध केला. या प्रकरणी दोषी असणाऱ्या संबंधित डॉक्टर व कर्मचारी यांनी बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
या सर्व प्रकरणाची रुग्णालय प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 3 जेष्ठ डॉक्टरांची त्रि सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या 48 तासात चौकशीचा अहवाल देण्याच्या सूचना समितीला देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारची कुचराई न करता पारदर्शक अहवाल तयार करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल आल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवर हा अहवाल पाठवण्यात येईल, असे मत प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी सांगीतले.