सांगली - मला मोदी आणि शाहांची काळजी वाटते. झोपेतही ते शरद पवार म्हणत चवताळून उठत तर नसतील ना? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची खिल्ली उडवली आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते.
सभेत शरद पवार यांनी भाजप सरकार व नेत्यांवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना पवार म्हणाले, "महाराष्ट्रात पंतप्रधान येवो अथवा गृहमंत्री येवो भाषणात त्यांच्या बोलण्यात कायम एकच गोष्ट. मला त्यांची काळजी वाटते. ते दोघे झोपोतसुद्धा माझ्या नावाने चवताळून उठत तर नसतील ना? अशी शंका येते"
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेला एक तरी फोटो प्रसिध्द करावा - जयंत पाटील
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमध्ये स्मारक उभारू असे सांगितले. मात्र, गेल्या तीन वर्षात एक इंचही काम पुढे सरकले नाही. शिवाय महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर हॉटेल सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्या गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तळपली तिथे आता हे छमछम सुरू करणार का? असा संतप्त सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला. तासगाव तालुक्यातील मणेराजूरी येथे आयोजित या प्रचार सभेसाठी उमेदवार सुमनताई पाटील, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम,राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.