सांगली - लोक येतात-जातात, पण एका पावसाने राज्य बदलते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फार चिंता करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत साताऱ्यामधील पावसात भिजलेल्या सभेची आठवण कार्यकर्त्यांना करुन दिली. काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मिरजमध्ये आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.
खानापूर तालुक्यात काँग्रेसला हादरा, २६ नगरसेवकांसह २५ सरपंचांचा रामराम
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला 'जोरदार धक्का' दिला आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पाटील यांचे चिरंजीव व विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनीही राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. तसेच विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा यांच्यासह 26 नगरसेवक आणि खानापूर तालुक्यातील 25 सरपंचांनी यावेळी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे खानापूर तालुक्यात काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीने सदाशिव पाटील यांना राष्ट्रवादीत घेतले आहे. यावेळी बोलताना सदाशिवराव पाटील म्हणाले की, काँग्रेसमध्ये आपल्याबद्दल वरिष्ठांच्याकडे केवळ कान भरून त्रास देण्याचा उद्योग झाला. त्यामुळे आपण काँग्रेसला रामराम ठोकल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सदाशिवराव पाटील यांचे वडील हणमंतराव पाटील यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सदाशिवराव पाटील हे कधी आपल्यापासून दूर आहेत, असं वाटलं नाही. या मतदारसंघात पक्ष आणखी वाढेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सदाशिवराव पाटील यांच्या मागे उभे राहावे आणि सत्तेच्या माध्यमातून आम्ही जनतेचे कामे करू असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.