सांगली - लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून ज्येष्ठ नागरिकांसह वयोवृद्धांनी लसीकरण करून करून घ्यावे, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. 22 जानेवारी पासून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 6 हजार 85 जणांवर दंडात्मक कारवाई आली. व एकूण 16 लाख 16 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे-
जिल्ह्यात महापालिका क्षेत्रासह तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी 25 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यामध्ये सांगली शासकीय रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर इतर खासगी रुग्णालयातही पुढील टप्प्यात लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे. त्यासाठी संबंधित पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असून त्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा- कामठा फाटा येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला