सांगली - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील सरकारीसह खाजगी शाळा, मॉल्स, चित्रपटगृह बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे. तर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. तसेच मिरजमधील प्रसिद्ध हजरत मिरासाहेब दर्ग्यातील उरूस रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा - कोरोनाचा कहर; 31 मार्चपर्यंत सर्व शाळा,मॉल्स,चित्रपटगृह राहणार बंद
जिल्ह्यात परदेशातुन परतणाऱ्या प्रवाश्यांची संख्या 90 वर पोहचली आहे. सध्या एकही प्रवाशाला कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. अशी माहीती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला आहे. या कायदा अन्वये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील महाविद्यालये आणि आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, अंगणवाड्या सुद्धा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात, आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना संबधित संस्थाप्रमुखांना देण्यात आली आहे.
यासोबतच, चित्रपटगृहे, तरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे, संग्रहालये , शॉपिंग मॉल मधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान, दुध, भाजीपाला व औषधालय वगळून) 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे सुध्दा चौधरी यांनी सांगितले. तसेच, शासन निर्णयाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, 20 मार्च पासून सुरू होणारा मिरजमधील प्रसिद्ध हजरत मिरासाहेब दर्गा उरूस सुद्धा रद्द करण्यात आला आहे. नागरिकांना घाबरू नये,अफवांवर विश्वास ठेवू नये,मात्र योग्य ती खबरदारी घ्यावी आवाहन यावेळी त्यांनी केले.