सांगली - टिकटॉकवरील चॅलेंज स्वीकारण एका विद्यार्थ्याच्या चांगलेच महागात पडले आहे. टिकटॉकवरील 'स्कल ब्रेकर चॅलेंज' या व्हिडीओचे शाळेत अनुकरण करत असताना ही घटना घडली. यामध्ये या विद्यार्थ्याचा हात मोडला आहे. तर पायाला व डोक्यालाही दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरील अनेक गेम्समुळे अनेकांचे प्राण गेल्याच्या घटना ताज्या आहेत. तर सध्या भारतात सोशल मीडियावरील 'टिकटॉक'ने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये असणारे चॅलेंज व्हिडीओ बनवण्यासाठी तरुणाई वेडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता हे जीवघेणे खेळ शाळेच्या आवारात पोहोचले आहेत.
- काय आहे स्कल ब्रेकर चॅलेंज -
या चॅलेंजमध्ये मध्यभागी एक जण उभा राहतो. तर त्याच्या शेजारी दोन जण उभे राहतात. मध्यभागी उभ्या राहणाऱ्या व्यक्तीने उंच उडी घेतल्यानंतर शेजारचे दोघेही त्या व्यक्तीला पायाने खाली पाडतात. त्यामुळे अतिशय उंचावरून मधली व्यक्ती जोरात जमीनीवर खाली पडते. अनेकदा संपुर्ण तोल गेल्याने नेमका किती आणि कुठे मार लागेल? याचा अंदाज येत नाही.
या चॅलेंज व्हिडिओ बाबत जखमी विद्यार्थ्यांस काही कल्पना नव्हती. त्यामुळे तो हा गेम खेळण्यास तयार झाला आणि त्यात त्याला ही गंभीर इजा झाली, असे जखमी मुलाच्या पालकांकडून सांगण्यात आले आहे.