वाळवा (सांगली)- सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले असून पोलीस प्रशासन व राज्य प्रशासन अहोरात्र झटत आहेत. येलूर येथील गृहरक्षक शाहीर सत्त्यवान रावण गावडे याने कवितेतून कोरोनाविषयी प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे आणि त्यांचे सहकारी नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे यासाठी प्रयत्न करत आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले. शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करत घरी थांबण्याचे आवाहन सत्यवान गावडे यांनी कवितेतून केले आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले पंधरा दिवस कुरळप पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या 21 गावातील लोकांना घराबाहेर पडून नये यासाठी उत्तमरित्या नियोजन केले आहे.
पोलिसांकडून लोकांना कोरोनाविषयी माईक वरून उपदेश देणे सुरु आहे. कधी मोटारसायकल वरून तर कधी गावातून पायी चालत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. मात्र, अजून ही गावातून पोलीस गाडी जाताना दिसली की लोक पळत जाऊन लपतात आणि गाडी गेली की पुन्हा रस्त्यावर येतात, असे चित्र काही ठिकाणी दिसून येते.