सांगली - जिल्ह्यातील कडेगाव येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा मोहरम सण यंदा रद्द करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताबूत भेटीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय कडेगाव नगरपालिका आणि मोहरम कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. २०० वर्षांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक गगनचुंबी ताबूत भेटींच्या सोहळ्याची परंपरा खंडित झाली आहे.
संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सांगली जिल्ह्याच्या कडेगाव येथील मोहरम सण प्रसिद्ध आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. या ठिकाणी पार पडणाऱ्या गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येत असतात. या सोहळ्यात ११० ते १३५ फूट उंचीचे ताबूत असतात.
200 वर्षांपूर्वी सोहळ्याची सुरुवात-
कडेगावचे तत्कालीन संस्थानिक भाऊसाहेब देशपांडे सरकार यांनी २०० वर्षांपूर्वी मोहरमनिमित्ताने या गगनचुंबी ताबूत भेटीच्या सोहळ्याची सुरवात केली. गावात १४ ताबूत स्थापन करण्यात आले. तेव्हापासून गावातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन दरवर्षी हा मोहरम ताबूत भेटीचा सोहळा पार पाडत आहेत. मात्र, यंदा हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या या प्रतिकाला कोरोनाचा फटका बसला आहे.
कडेगाव नगरपालिकेच्या अध्यक्षा नीता देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका, पोलीस प्रशासन, ग्रामस्थ, आणि ताबूत मानकरी यांची बैठक पार पडली. या बैठकीत ताबूत भेटीचा सोहळा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २०० वर्षांपासून सुरू असलेली गगनचुंबी ताबूत भेटीची परंपरा यंदा खंडित झाली आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने देशभरातील सर्व धार्मिक सोहळ्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.