सांगली - राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदत तुटपुंजी असल्याने भाजप आणि व्यापाऱ्यांनी सांगलीमध्ये आंदोलन केले आहे. लाखोंचे नुकसान झालेले असताना राज्य सरकारकडून पुरग्रस्तांची थट्टा करण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी प्रतिकात्मक धनादेश परत करण्याचे आंदोलन करत आघाडी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी, नागरिक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारकडून पुरग्रस्तांना नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात येत आहे. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झालेले असताना सरकारकडून अगदी पाचशे व एक हजार रुपये अशा पद्धतीची मदत करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमधून सरकारच्या मदती विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-टी-20 विश्वचषक : भारत-पाकिस्तान सामन्याला ग्रहण, राऊत-ओवैसींसह या नेत्यांचा विरोध
भीक नको ,मदत परत घ्या...
सरकारची मदत नाकारण्याची भूमिका व्यापार्यांनी घेतली आहे. व्यापाऱ्यांनी आणि भाजपच्यावतीने सांगलीमध्ये आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आलेल्या मदतीचा प्रतीकात्मक धनादेश परत करत आघाडी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत विचार करून पुन्हा पंचनामे करत भरीव मदत करावी, अशी मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा सांगली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वाती शिंदे यांनी दिला आहे.
आंदोलनात सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात भाजप नगरसेवक, पदाधिकारी व सांगलीतील पूरग्रस्त व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.