सांगली - कायम विनाअनुदानित शाळांचा निधी तातडीने वाटपासह विविध मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या घेऊन सांगली ते बारामती शिक्षकांची पायी दिंडी निघाली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालण्यासाठी सांगलीतून ही पायी दिंडी रवाना झाली.
राज्यात कायम विनाअनुदानित शाळांना राज्य सरकारकडून 1 एप्रिल 2019 पासून 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्याप निधी वाटप करण्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील कायम विनाअनुदानित शिक्षकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांकडून आंदोलनही करण्यात येत आहे. सरकारकडून याबाबत दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्य शासनाला 31 ऑगस्टपर्यंत विनाअनुदानित शाळांना देय असलेले वेतनाचे आदेश काढण्यात यावेत, अन्यथा 1 सप्टेंबरपासून पुन्हा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. मात्र, तरीही सरकारकडून दखल घेण्यात येत नसल्याने विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने सांगली ते बारामती अशी पायी दिंडी काढण्यात आली.
हेही वाचा - गगनचुंबी ताबूत भेटीविनाच पार पडला कडेगावचा मोहरम
आज सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिक्षकांनी ही पायी दिंडी सुरू केली. बारामतीमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबतचे निवेदन देण्यासाठी ही दिंडी रवाना झाली. सोशल डिस्टन्स पाळत 15 हुन अधिक शिक्षक या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. गेली पंधरा ते वीस वर्षे बिनपगारी शिक्षक काम करत आहेत, मात्र सरकारकडून शिक्षकांना वेळोवेळी आश्वासने देण्यात आली आणि गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात विनाअनुदानित शाळेचे शिक्षक सापडले आहेत, असे मत विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - सलग दोन तास पॉप सिंगिंग आणि डान्स करत मायकल जॅक्सनला अभिवादन