सांगली - दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान, शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे. शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानीचा आरोप -
कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीमध्ये देशातल्या विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. केंद्रसरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवला. गांधीवादी मार्गाने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना मोदी सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लावण्यासाठी आंदोलन मोडून काढण्यासाठी लाठीहल्ला केला असल्याचा आरोप यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला.
हेही वाचा - राज्यातील सर्व जागांवर भाजपचा विजय होईल - चंद्रकांत पाटील
अन्यथा स्वाभिमानीही दिल्लीकडे कूच करणार -
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे दिल्लीकडे कूच करतील, असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी यावेळी दिला आहे.