सांगली Sangli Shivsena Dispute: मिरज शहरातील जुना किल्ला भाग येथे असणाऱ्या एका जागेच्या मालकी हक्कावरून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीचं जुंपली आहे. (Shinde group) ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगूरे यांनी पटवर्धन संस्थानकडून ही जागा मिरज शहर शिवसेनेला भाडे करारवर 1989 साली देण्यात आल्याचे सांगत या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यालय उभारण्यात येत होते. या ठिकाणी पत्र्याचे शेड मारून कामकाज सुरू होते. (Thackeray group encroachment )
अतिक्रमण पाडून टाकण्याची मागणी: अधिकृत शिवसेना आपली असून या जागेवर आपला हक्क असल्याचा दावा करत ठाकरे गटाकडून करण्यात येत असलेले बांधकाम बेकायदेशीर असल्याची तक्रार पालिकेकडे करत अतिक्रमण पाडून टाकण्याची मागणी केली होती. यानंतर दुपारी पालिकेच्या अतिक्रमण पथकासह शिंदे गटाचे शहर अध्यक्ष किरण राजपूत हे या जागेवर पोहचले होते.
दोन गटातील शहर अध्यक्षात हमरी-तुमरी: या ठिकाणी दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या जागेवरील बांधकाम थांबवण्यासाठी शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शिंदे गट शहर अध्यक्ष किरण राजपूत आणि ठाकरे गट शहर अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे यांच्यात वादावादी आणि शिवीगाळ होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापटी: सायंकाळी पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात उभारण्यात येणारे पत्र्याचे शेड पाडण्याची कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे ठाकरे गट शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत जागेवर ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी सुरू केली; मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापटीचा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी सर्व आंदोलकांचा विरोध झुगारून त्यांना ताब्यात घेतले. यानंतर पालिकेकडून जेसीबीने ठाकरे गटाकडून उभारण्यात येत असलेलं पत्र्याचं शेड जमीनदोस्त करण्यात आलं.
राजकीय दबावापोटी कारवाई केल्याचा आरोप: ठाकरे गट शिवसेना शहर अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे म्हणाले की, करण्यात आलेली कारवाई ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि चुकीची आहे. जागेच्या बाबतीत सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत. मात्र, राजकीय दबावापोटी ही कारवाई करण्यात आली आहे. पण याला आपण चोख प्रत्युत्तर देऊ, असं मैंगुरे यांनी स्पष्ट केलं आहे.
किरण राजपुतांनी दिलं स्पष्टिकरण: एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे शहर प्रमुख किरण राजपूत यांनी बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. कायद्यानुसार निवडणूक आयोग आणि न्यायालयानं शिवसेना एकनाथ शिंदे गटाची असल्याचं स्पष्ट केलं आहे. पक्ष आणि चिन्ह देखील शिंदे गट शिवसेनेला दिलेलं आहे आणि त्यामुळे मिरज इथली ही जागा शिवसेनेच्या नावानं आहे. त्यामुळे अधिकृतरीत्या या जागेची मालकी ही शिवसेनेच्या शिंदे गटाची आहे. ती कोणत्याही पदाधिकाऱ्याची नाही. त्यामुळे ही जागा आम्ही ताब्यात घेणार, असं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: