सांगली - लोकसेवा आयोगाची सुधारित जाहिरात प्रसिद्ध करा, अन्यथा राज्यात परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. तसेच आयोगाच्या अध्यक्षांची गाढवावरून धिंड काढण्याचा इशाराही पडळकर यांनी दिला. ते सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध जागेच्या भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. आरक्षणानुसार जागा भरती होत असताना यातील आरक्षणाच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफरी झाल्याचा आरोप पडळकर यांनी केला. लोकसेवा आयोगाकडून गेल्या दहा वर्षात 93 जागा चोरण्यात आल्या आहेत. यात धनगर, वंजारी समाजासाठी आरक्षित असणाऱ्या जागांमध्ये हा घोळ झाला आहे. त्यामुळे नियमानुसार असणाऱ्या या जागा कोणत्या हेतूने डावलण्यात आल्या, असा सवाल पडळकर यांनी केला.
राज्यातील पीएसआय पदासाठीची जाहिरात शुक्रवारी प्रकाशित झाली. या जाहिरातीनुसार, 650 पदांची भरती करण्यात येणार आहे. यात भ.ज (क) या वर्गासाठी 24 तर भ.ज (ड) या वर्गासाठी 13 जागा आरक्षित असणे अपेक्षित आहे. मात्र, यात भ.ज (क) या वर्गासाठी केवळ 2 जागा देण्यात आल्या आहेत. तर भ.ज (क) या वर्गासाठी एकाही जागा आरक्षित नाही. राज्यातील धनगर आणि वंजारी जमातीतील उमेदवारांशी निगडीत हा प्रश्न आहे. हा भ.ज (क) प्रवर्गात धनगर समाज तर भ.ज (ड) मध्ये वंजारी समाज मोडतो.
हेही वाचा - शिक्षिकेशी अरेरावी केल्यावरून संस्था चालकाची विद्यार्थ्यांना स्टंपने मारहाण
3 मे रोजी या जागांसाठी परीक्षा होणार आहे. यावर्षी 22 पैकी 2 जागा आरक्षणाच्या आहेत. तर उर्वरीत 20 जागा या कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला. या जागांमध्ये झालेला घोळ पाहता सरकारने आणि राज्यपालांनी याची दखल घ्यावी आणि लोकसेवा आयोगाला पुन्हा जाहिरात प्रसिध्द करण्याच्या सुचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा राज्यात लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही. त्याच बरोबर आरक्षण जागांमध्ये घोळ घालणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांची हक्कलपट्टी करावी, अन्यथा त्यांची गाढवावरून धिंड काढू असा इशाराही पडळकर यांनी यावेळी दिला.