सांगली - कोरोनाचे नियम पाळून मद्यविक्री करावी अन्यथा दारू दुकानांवर कारवाई करू, असा इशारा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिला आहे. तसेच शिथिलता जरी असली तरी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे नागरिक पालन करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शर्मा यांनी दिला आहे.
ऑरेंज झोनमध्ये असल्याने सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. दारूची दुकानेही सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि नियम पाळले जातील का? याबाबत मोठा प्रश्न असल्याने सांगली पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी याबाबत दारू दुकानदार आणि तळीरामांना इशारा दिला आहे. दारू विक्री करणाऱ्या दुकान मालकाने दारू विक्री करताना सोशल डिस्टन्सचे पालन करण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. दुकानासमोर त्यासाठी सोशल डिस्टन्सबाबत चौकोन किंवा गोल आखून त्यामध्ये दारू खरेदीसाठी येणाऱ्या व्यक्तीला उभे राहण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. त्यामुळे गर्दी टाळता येईल. पण ज्या दारू दुकानाच्या ठिकाणी दारू खरेदी-विक्री करताना सोशल डिस्टन्स आणि कोरोनाचे नियम पाळले जाणार नाहीत. त्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा समिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील जे दारू दुकान सुरू होणार आहेत, त्याठिकाणी खबरदारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सबाबत पोलीस ठाण्याअंतर्गत सोशल डिस्टन्स मॅनेजमेंट समितीही तयार करण्यात आल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कोरोनाचा धोका सांगली जिल्ह्याला कायम आहे. त्यामुळे सांगलीकर नागरिकांनी शिथिलता मिळाली म्हणून विनाकारण बाहेर पडू नये, त्याचबरोबर जी दुकाने सुरू करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी सामाजिक अंतर पाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, तर नागरिकांनीही सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर दुचाकीवरून केवळ एकाच व्यक्तीला परवानगी आहे, तर चारचाकी वाहनांमधून ड्रायव्हर व्यतिरिक्त दोघांना अशी परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे पालन करणे बंधनकारक असून जे लोक पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सुहेल शर्मा यांनी दिला.