सांगली - कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातील पूर पट्ट्यात येणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच जे लोक स्थलांतरित होणार नाहीत, त्यांची घरं सील करण्याचा इशारा पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. त्याच बरोबर पालिका प्रशासनाच्या वतीने कोणत्या भागात किती फूटांवर पाणी येऊ शकते आणि नागरिकांना कोणत्या ठिकाणी स्थलांतरीत व्हायचे आहे, याबाबत पत्रक काढण्यात आले आहे.
स्थलांतरीत व्हा..अन्यथा घरं सील करू, पालिकेचा पूर पट्ट्यातील नागरिकांना इशारा कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्याचबरोबर कोयना धरणातून कृष्णेत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. एका दिवसात जवळपास दहा फूटांपेक्षा अधिक पाण्याची पातळी वाढली आहे. सायंकाळपर्यंत ही पातळी 35 फूटांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पाणी पातळी वाढण्याची वाट न बघता पालिका प्रशासनाने पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहे. तसेच स्थलांतर न करणाऱ्यांची घरं सील करण्यात येतील,असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे. सध्या पालिका प्रशासनाने 3 हजार नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. तसेच पाण्याची पातळी वाढल्यानंतर कोणत्या भागात पाणी येऊ शकतं, आणि संबंधित नागरिकांनी स्थलांतरित होण्याचा जागा यासंदर्भात सविस्तर माहिती पुरवण्यात आली आहे.पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्या वतीने दत्तनगर, काका नगर, सूर्यवंशी प्लॉट, मगरमछ कॉलनी या ठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.