सांगली - विटा तहसीलदार मारहाण प्रकरणी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. वाळू वाहतूक दंड प्रकरणातून चंद्रहार पाटील यांच्याकडून तहसीलदारांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता.
एका आठवड्यापूर्वी विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना चंद्रहार पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती. याबाबत तहसीलदार शेळके यांनी विटा पोलिसात पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वी तहसीलदार शेळके यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली होता. यातील संबंधित वाळू वाहतूकदारांना दंड ठोठावला होता, ज्यामध्ये पैलवान पाटील यांचाही समावेश होता. दरम्यान, हा दंड कमी करण्याची मागणी पाटील यांच्याकडून तहसीलदार शेळके यांना करण्यात आली होती. मात्र, तहसीलदार यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी अशी सूचना दिली होती आणि यातून ३ मे रोजी विटा तहसील कार्यालयाच्या आवारात पैलवान पाटील आणि तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्यात वादावादी होऊन चंद्रहार पाटील यांनी मारहाण केल्याची तक्रार शेळके यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत पाटील यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला. मात्र, एक आठवडा उलटूनही अद्याप त्यांना अटक झालेली नाही. याच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील महसूल कर्मचार्यांनी आज 'काम बंद' आंदोलन केले. यामध्ये जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील तहसीलदार तसेच महसूल कर्मचार्यांनी काम बंद ठेवत, मारहाणीचा निषेध करत तातडीने पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे.