सांगली - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटी गटातून महाविकास आघाडी उमेदवार असणाऱ्या मन्सूर खतीब यांच्याविरोधात सेवानिवृत्त शिक्षक यशवंत चव्हाण यांनी तक्रार दाखल केली. जिल्हा निबंधक यांची भेट घेऊन जिल्हा बँकेचे 56 लाखांची थकबाकीदार असणाऱ्या खतीब यांची उमेदवारी अर्ज रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सेवानिवृत्त शिक्षक यशवंत चव्हाण यांनी सांगितले आहे. तर मन्सूर खतीब यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
थकबाकीदार खतींबांची उमेदवारी रद्द करा -
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सध्या सुरू आहे. (Sangli DCC Bank Election 2021) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीमधून सोसायटी गटातून उमेदवार असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मन्सूर खतीब यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. जत तालुक्यातील डफळापुर येथील सेवानिवृत्त शिक्षक यशवंत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन खतीब यांची उमेदवारी बेकायदा असल्याचा आरोप केला. खतीब हे राजहंस विविध कार्यकारी सोसायटीचे 56 लाखांचे जिल्हा बँकेकडे थकबाकीदार आहेत. याच मुद्द्यावरून 2015साली उच्च न्यायालयमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर खतीब यांना आपली उमेदवारी मागे घेतले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीमध्ये सावळागोंधळ घालून खतीब यांनी उमेदवारी मिळवली आहे. कायदेशीरदृष्ट्या थकबाकीदार असल्याने त्यांना निवडणूक लढवत येत नाही. त्याबाबतचे सर्व पुरावे आणि न्यायालयाचा निकाल आपल्याकडे असल्याचे यशवंत चव्हाण यांनी स्पष्ट केला आहे. तसेच या मुद्द्यावरून सांगलीमध्ये आज जिल्हा निबंधक यांची भेट घेऊन सदरची बाब निदर्शनास आणून दिली आणि उमेदवारी रद्द करण्यासाठी येत्या 4 दिवसात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. याप्रसंगी न्यायालयात देखील जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Rape On 10 Month Old Girl In UP; 10 महिन्याच्या चिमुरडीवर नोकराने केला बलात्कार
आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही -
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार मन्सूर खतीब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले. 2015साली चव्हाण यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. तसेच ज्या संस्थेचे आपण 56 लाखांचे कर्ज थकवल्याचा आरोप करण्यात येत आहे त्या संस्थेचे केवळ आपण सभासद आहोत. त्यामुळे त्या कर्जाचा प्रत्यक्ष आपला कोणताही संबंध नाही. चव्हाण यांनी कायदेशीरबाबी आव्हान द्यावे त्यात सर्व सत्य समोर येईल, असेही खतीब यांनी स्पष्ट करत चव्हाण यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.