सांगली - महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आज दलित महासंघाच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्यात साचलेल्या पाण्यामध्ये नाव (नावाडी) उतरवत, त्यात बसून आंदोलन करण्यात आले. पालिका प्रशासनाच्यावतीने रस्ते, त्यावर पडलेले खड्डे आणि साचलेले पाणी याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
सांगली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचले. कित्येक दिवस या पाण्याचा निचराही होत नसल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी छोटे-मोठे अपघातही होतात. याकडे महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी केला.
पालिकेच्या बांधकाम विभागाबरोबर आयुक्तांनाही रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत निवेदने दिली आहेत. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शहरातील रस्त्यावर कायम पाणीच राहणार असेल, तर प्रशासनाने आता नावाडी विभाग सुरू करावा, अशी उपहासात्मक मागणी आंदोलकांनी केली. पालिका प्रशासनाने रस्त्यांच्या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दलित महासंघाकडून देण्यात आला.