सांगली - महापुरानंतर बकाल झालेल्या सांगली शहराने आज पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेतील सहभागामुळे शहराचे रुपडे पालटले आहे. रस्ते, चौक, गल्ली आणि झोपडपट्टया रंगवल्याने शहराचे सौंदर्य खुलले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट २०१९ मध्ये सांगली जिल्ह्यावर महापुराचे संकट आले होते. यात सांगलीसह मिरज शहराची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र बकाल बनले होते. हे चित्र केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणामुळे पालटले आहे. खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीपासून चौक सुशोभीकरण, शहरातील कचऱ्याची विल्हेवाट आणि रंगरंगोटी, अशा अनेक पातळ्यांवर शहराची नवी ओळख निर्माण होत आहे. २०१९ मध्ये सांगली शहराने स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि देशात १०६ क्रमांक मिळवण्याचा बहुमान पटकावला होता. महापुरानंतर आता शहराला पुन्हा उभे करण्याचे आव्हान महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने लिलया पेलले आहे. केंद्र शासनासह सांगलीतील सामाजिक संस्था, उद्योजक यांचेदेखील यासाठी सहकार्य लाभत आहे.
हेही वाचा - 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यास बजरंग दलाचा विरोध
शहरातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सर्व सार्वजनिक आणि खासगी भिंती, शौचालय, खासगी घरांवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे संदेश भिंतींवर रेखाटण्यात आले आहेत. पालिकेने शहरातील कचरा प्रश्नही मार्गी लावला आहे. प्रत्येक घरातून घंटा रिक्षागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. इतकेच नव्हे तर ओला आणि सुका असे कचऱ्याचे वर्गीकरणही करण्यात येत आहे.
हेही वाचा - 'कोरोना व्हायरस'ला COVID-19 नावं देण्यामागे काय आहे कारण?
महापुराच्या आपत्तीनंतर सांगली शहराला नव्याने उभारणे आव्हानात्मक आहे. मात्र, केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या माध्यमातून सांगली महापालिकेने शहराचे रूपडे तर पालटलेच शिवाय "सांगली बहू परिस चांगली"करून दाखवली आहे.