सांगली - राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात आज सांगलीमध्ये भाजपने आंदोलन केले. 'मेरा अंगण, मेरा रणांगण' अशी घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवला. तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून सरकार समर्थनार्थ शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले आहे.
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करत भाजपकडून आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील भाजप आमदारांकडून राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'मेरा अंगण, मेरा रणांगण' आंदोलन केले. महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करत ठाकरे सरकार चले जाव, अशा घोषणा यावेळी दिल्या. सांगलीच्या महापौर गीता सुतार, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांच्यासह मोजक्या पदाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्स पाळत यामध्ये सहभाग घेतला होता.
तर दुसर्या बाजूला भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. सांगली आणि मिरजेत शिवसैनिकांनी महाराष्ट्रद्रोही भाजप, अशा घोषणाबाजी करत भाजपचा निषेध नोंदवला. कोरोनाच्या स्थितीत लढणाऱ्या सरकार विरोधातील भाजपचे आंदोलन म्हणजे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी या सर्वांचा अपमान असल्याचा आरोप करत आम्ही ठाकरे सरकारसोबत, अशी फलक झळकवत सरकारची पाठराखण केली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराजे काटकर, महेंद्र चांडाळ यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत हे आंदोलन करण्यात आले.