सांगली - भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेची वाट धरली आहे. मुंबईत मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत तासगावच्या नगरपालिका आणि पंचायत समितीच्या सभापतीसह खासदारांच्या शिलेदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे खासदार आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
भाजपा खासदारांचे शिलेदार शिवबंधनात
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे भाजपा खासदार संजयकाका पाटील आणि भाजपाला धक्का बसला आहे. होम ग्राऊंड असलेल्या तासगाव तालुक्यात खासदार संजय पाटील गटाला गळती लागली आहे. खासदार पाटील यांचे कट्टर समर्थक आणि भाजपाचे तासगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी आणि सावर्डेचे सरपंच प्रदिप माने यांनी खासदार पाटील आणि भाजपाला सोडचिट्टी दिली. या तिघांनी शनिवारी मुंबईमध्ये मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील व जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निवडणूकीच्या तोंडावर खासदार आणि भाजपाला धक्का
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहेत. यामध्ये तासगाव तालुक्यातील एकूण ६८ पैकी ३९ गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तर २०२१ ला तासगाव नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या परिस्थितीत खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर मानले जाणाऱ्या तिघांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशामुळे खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
हेही वाचा - शिपाई कंत्राटी अध्यादेश फाडून सरकारचा निषेध; शिक्षकेतर संघटना एकवटल्या
हेही वाचा - सोनियांचे पत्र म्हणजे सरकारच्या नाकर्तेपणाचा पोचपावती, आता तरी काँग्रेसने सत्तेवर लाथ मारावी - पडळकर