सांगली - मंदिरे खुले करण्याच्या मागणीसाठी भाजपाकडून आज सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारला जाग यावी, यासाठी टाळ-मृदंग वाजवत सांगलीच्या गणपती मंदिरासमोर राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. मंदिरे खुली करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे भाजपाने गणरायाला घातले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊननंतर आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. हळूहळू सर्व काही सुरू होत आहे. मात्र, राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यावर अद्याप निर्बंध आहेत. त्यामुळे आज भाजपाच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. सांगली भाजपाच्यावतीनेही महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशातील इतर राज्यात मंदिरे खुली झाली आहेत. केवळ महाराष्ट्रातच मंदिरांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. दारूची दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार मात्र, सुरू करण्यात आली. नागरिकांची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे शासनाने तत्काळ सुरू करावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपाच्यावतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, आज मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाने सिद्धिविनायक मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबाहेरही आंदोलने केली आहेत.