सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या बाजार समितीमधील सौदे बंद झाले आहेत. हळद, गूळ आणि बेदाणा सौदे ठप्प झाल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. ३१ मार्चपर्यंत हे सौदे बंद राहणार आहेत.
हळदीची जागतिक बाजार पेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. त्याचबरोबर बेदाणा आणि गुळाचे मोठ्या प्रमाणात सौदे पार पाडतात. मात्र, सध्या कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाचा फटका सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या २ दिवसांपासून हळद आणि गूळ तर ६ दिवसांपासून बेदाणा सौदे बंद झाले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची फटका बसला आहे.
हळदीची २ दिवसात सुमारे 2 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. तर गुळाची 70 ते 75 हजार रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बेदाणा सौदे ६ दिवसांपासून बंद असल्याने सुमारे 20 कोटींच्या आसपास उलाढाल ठप्प झाली आहे. एकूण 23 कोटींच्या आसपास हळद, गूळ आणि बेदाणा मालाचे उलाढाल ठप्प झाल्याने बाजार समिती, व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठा फटक बसत आहे. ३१ मार्चपर्यंत आता बाजार समितीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सौदे बंद राहणार असल्याची माहिती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव हरी पाटील यांनी दिली.