सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना विरोधात व्यापक महाआघाडी करण्यासाठी येत्या 19 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये छोट्या-मोठ्या पक्षांची बैठक पार पडणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिली आहे. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीकडे एकत्रित जागेची मागणी करण्यात येणार आहे, असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी आणि मनसेला सोबत घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, दोघांनीही महाआघाडीत यावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.
हेही वाचा... पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना विरोधात महाआघाडी निर्माण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यातल्या छोट्या-मोठ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत महाआघाडी करण्याची निर्णय घेण्यात आला आहे आणि येत्या 19 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये या सर्व छोट्या-मोठ्या आणि डाव्या घटक पक्षांची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.
हेही वाचा... काँग्रेसला धक्का.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी कामगार पक्ष, प्रहार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तसेच डाव्या संघटना अशा सर्वच शिवसेना-भाजपा विरोधातील छोट्या-मोठ्या पक्ष्यांची ही बैठक पार पडणार असून, यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडे किती जागा मागायचे ? त्याच बरोबर एकत्रितपणे या जागा मागण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.
हेही वाचा... महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार - महादेव जानकर
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, शेकापचे नेते जयंत पाटील, सीपीएम नेते प्रकाश रेड्डी यांच्यासह विविध पक्षांचे आणि डाव्या संघटनांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार असल्याची माहितीही शेट्टी यांनी दिली. या महाआघाडी मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि मनसेला सामील करण्यासाठी आपला प्रयत्न असून वंचित बहुजन आणि मनसेनेही या महाआघाडी मध्ये सामील व्हावे, असे आव्हान यावेळी राजू शेट्टींनी केले आहे.