सांगली : सांगली पोलीस मुख्यालयातील ( Sangli Superintendent of Police Office ) चंदन चोरीचा ( Sandalwood Theft ) पोलिसांनी अखेर छडा लावत दोघा चोरट्यांना अटक केली आहे. तर या घटनेनंतर आता सांगली पोलिसांनी मुख्यालय परिसरात तगडी सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. परिसरात येणारे इतर रस्ते बंद करीत एकच एंट्री व्यवस्था करण्यात आली असून, त्याठिकाणी "चेक पोस्ट" उभे करण्यात आले आहे. पोलिसांनी कसून चौकशी करीत, आरोपींना अटक केली आहे. दोन्ही गुन्हेगार हे मिरजेत राहणारे आहेत.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह : सांगली पोलीस दलाचे धाबे दणाणून सोडणारा चोरीचा प्रकार 15 जुलै रोजी घडला. चोरट्यांनी थेट सांगली पोलीस मुख्यालयात चंदनाच्या झाडावर डल्ला मारला. दोन चंदनाची झाडे करवतीने कापून चोरून नेली. त्यामुळे पोलीस दलाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला. पण, म्हणतात ना "कानून के हात, लंबे होते है" सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या पाच दिवसांत चंदन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. चंदन चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. रमेश चंदनवाले आणि अभिमन्यू चंदनवाले, असे या दोघा चंदनचोरांची नाव आहेत, हे दोघेही मिरजेतील राहणारे आहेत.
सुरक्षा यंत्रणेत वाढ : दरम्यान, चंदनचोरीची घटना दुसऱ्यांदा घडली. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी आता पोलीस मुख्यालयाच्या सुरक्षा यंत्रणेची व्यवस्था तगडी बनवण्याचे निश्चित केले. त्या दृष्टीने पोलीस मुख्यालयात इतर ठिकाणाहून येणारे रस्ते बंद करून टाकले आहेत. आता पोलीस मुख्यालयाच्या आत येण्यासाठी राखीव पोलीस दल ठेवले आहे. त्या ठिकाणीदेखील आता चेकपोस्ट उभारण्यात आले. त्यामुळे मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होणार आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेची सुरक्षा व्यवस्था भेदून आता आत येणे चोरट्यांना तसं मुश्किलच ठरणार आहे.
हेही वाचा : थेट पोलीस मुख्यालयात चोरट्यांनी मारला डल्ला, यंत्रणेला चकवा देत चंदनाच्या झाडांची केली चोरी