सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना तोंडावरील मास्क काढायला लावल्याचा प्रकार घडला आहे. इतकंच नव्हे तर आमदारांसोबत असणाऱ्या इतरांनाही भिडे यांनी मास्क काढायला लावला. खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे भिडे यांच्याकडून उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करत त्यांचावर कारवाईची मागणी आरपीआय (खरात) गटाकडून करण्यात आली आहे.
आमदारांना काढायला लावला मास्क
खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी एकत्र आले होते. या वेळी उद्घाटन आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते होत असताना संभाजी भिडे यांनी आमदार अनिल बाबर यांना मास्क काढायला लावून उद्घाटन करायला सांगितले. इतकंच नव्हे तर तिथे असणाऱ्या अन्य एका व्यक्तीलाही भिडे गुरुजींनी मास्क काढण्याच्या सूचना दिल्या. आमदार बाबर यांनी आपल्या तोंडावर लावलेला मास्क त्वरित काढून टाकत उद्घाटन केले. तर यावेळी संभाजी भिडे यांनीही यावेळी मास्क लावला नव्हता.
हेही वाचा - विधानपरिषदेच्या 12 आमदरांची नियुक्ती, राज्य सरकारचे राज्यपालांना पुन्हा स्मरणपत्र ?
संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी
सार्वजनिक ठिकाणी जाहीर कार्यक्रमांमध्ये संभाजी भिडे यांनी मास्क लावला नव्हता. तसेच उपस्थित असणाऱ्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर व इतरांना मास्क काढायला लावून कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करायला भाग पाडले आहे, असा आरोप करत राज्य शासनाने तत्काळ संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंपेक्षा भिडे यांचा आदेश मोठा?
कोरोनाची राज्यातील वाढती परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाऐवजी संभाजी भिडे गुरुजी यांच्या आदेशाचे पालन करणं अधिक महत्वाचं वाटलं का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.