सांगली - राजू शेट्टी वसंतदादांच्या घराण्यात फूट पाडू शकतो, एवढा चमत्कारिक माणूस आहे. भविष्यात राजनीतीचे एखादे पुस्तक जेव्हा लिहले जाईल, त्यावेळी कुटनीतीचा महामेरू म्हणून राजू शेट्टी यांचे नाव त्या पुस्तकात लिहिले जाईल. अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केली आहे. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते. शेट्टी केवळ निवडणूकी पुरता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले असून ते निवडणूकीनंतर राष्ट्रवादी सोबत राहणार नाहीत. असे भाकितही खोत यांनी वर्तवले आहे.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे. तर माने यांना पाठिंबा देण्यासाठी वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष सोडून स्थापन झालेल्या विकास आघाडीने इस्लामपूरच्या पेठ येथे मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सदाभाऊ खोत, वनश्री नानासाहेब महाडिक आणि विकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
राजू शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूकी पुरता गेले आहेत. निवडणुकीनंतर ते राष्ट्रवादीसोबत राहत नाही, ते पुन्हा इकडे-तिकडे होणार असे राजकीय भाकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वर्तवले आहे. पहिल्या निवडणुकीत आम्ही अपक्ष होतो आणि शेट्टीचे चिन्ह कपबशी होते. दुसऱ्या वेळेस शेट्टी महायुतीत गेले आणि तिथे चिन्ह मिळाले शिट्टी. आताच्या निवडणुकीत शेट्टी राष्ट्रवादीसोबत गेले आहेत आणि चिन्ह बॅट मिळाले म्हणजे चिन्हाला पण कळले आहे की शेट्टी बदलत आहेत, असा टोला खोत यांनी शेट्टी यांना लगावला आहे.
सांगली लोकसभेबाबत बोलताना वसंतदादा घराणे काँग्रेसच्या तिकिटा शिवाय कधीच लढले नाही, त्या घराण्यात देखील फूट पाडू शकतो, एवढा चमत्कारिक माणूस शेट्टी आहे. असा आरोप खोत यांनी शेट्टीवर लावला आहे. भविष्यात राजनीतीचे एखादे पुस्तक जेव्हा लिहले जाईल, त्यावेळी कुटनीतीचा महामेरू म्हणून राजू शेट्टी यांचे नाव त्या पुस्तकात लिहले जाईल, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केली आहे.