सांगली - राज्यातील अवकाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे तातडीने पीक कर्ज माफ करून फळबाग शेतकऱ्यांसाठी 50 हजार व कोरडवाहूसाठी 25 हजार हेक्टरी सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते इस्लामपूर मध्ये बोलत होते.
'तातडीने कर्जमाफी आणि नुकसानभरपाई द्या'
राज्यात गेल्या चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी आणि गारपीट झालेली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणामध्ये शेतकऱ्यांचे या अवकाळीने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शेतकरी हा अडचणीत आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाचे संकट आहे, अशा परिस्थितीत यंदा अवकाळी पुन्हा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची सरकारला चिंता असेल तर राज्यातील शेतकऱ्यांचे तातडीने पीककर्ज माफ करण्यात यावेत, त्याचबरोबर फळ बागायतदार शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये आणि कोरडवाहू शेतकऱ्याला 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.