सांगली - संथ वाहणारी कृष्णामाई गेल्या वर्षी कोपली आणि प्रलयंकारी असा महापूर आला. मात्र, याच कृष्णेच्या पात्रात खेळणाऱ्या 'रॉयल कृष्णाने' हजारो जणांना कृष्णामाईच्या कोपापासून वाचवण्याचे काम केले. त्यामुळेच महापुरात बुडणाऱ्यांसाठी रॉयल कृष्णा बोट क्लब हे 'जलदूत' ठरले. महापुराच्या कटु आठवणींमध्ये आज आपण रॉयल कृष्णा बोट क्लबच्या थरारक अनुभवाविषयी जाणून घेणार आहोत...
सांगलीमध्ये गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराला एक वर्ष पूर्ण होत आहे. आजही सांगलीकरांच्या मनात प्रलयंकारी महापुराच्या आठवणी घर करून आहेत. मात्र या महापुरात एक टीम अशी होती ज्यांनी बुडणाऱ्यां वाचवले, हजारोंची सुखरूप सुटका केली.
काय आहे 'रायल कृष्णा'?
सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात जणू रॉयल कृष्णा बोट क्लबचे अधिराज्य आहे, असे म्हणावे लागेल. कारण ही पाण्यातील खेळांसाठी काम करणारी संस्था आहे. बोट निर्मिती करणारे व्यावसायिक प्रताप जामदार यांच्या आणि अंतराष्ट्रीय नौकानयन प्रशिक्षक दत्ताभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून रॉयल कृष्णा बोट क्लब कृष्णा नदीमध्ये राष्ट्रीय वॉटर स्पोर्ट्समध्ये अधिराज्य गाजवत आहे. या क्लबचे सुमारे १०० हून अधिक सदस्य आहेत. या क्लबकडे वेगवेगळ्या बोटी आणि साधन सामुग्री आहे. यामध्ये कयाक, मोटर बोट याशिवाय पारंपरिक होड्यासुद्धा आहेत.
महापुराशी रॉयल कृष्णाचा सामना -
सांगलीमध्ये पाण्याची पातळी वाढत असताना कृष्णेच्या या सवंगड्यांनी पात्रात उतरायला सुरुवात केली होती. पाण्यावर स्वार होऊन नेहमीच पाण्याशी स्पर्धा करणाऱ्या रॉयल कृष्णेच्या टीमलाही कल्पना नव्हती की त्यांना प्रलयंकारी महापुराशी सामना करावा लागणार आहे. या टीमने नदीकाठच्या सखल भागात पाणी वाढत असताना स्थलांतर करण्यासाठी सूचना देण्याचे काम सुरू केले. बघता बघता पाण्याने इशारा आणि धोका पातळी ओलांडली होती. मात्र, नदीकाठच्या अनेक नागरिकांनी २००५प्रमाणे हा महापूर असेल या कल्पनेने घर न सोडने पसंद केले. त्यानंतर कृष्णेच्या पातळीने कहर केला. पाण्याची पातळी 57 फुटाच्या पुढे पोहोचली आणि सांगली शहर निम्याहून अधिक बुडाले, तर सांगलीवाडी शहर पाण्याच्या विळख्यात सापडले. त्यामुळे सगळेजण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडू लागले. सांगली पोलीस दलाबरोबर रॉयल कृष्णा बोट क्लबचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले.
महापुरात एनडीआरएफ, मिल्ट्री, नेव्हीची पथके येण्यापूर्वीच रॉयल कृष्णेचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले होते. आंतरराष्ट्रीय वॉटर स्पोर्ट्स प्रशिक्षक दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २००हून अधिक सदस्य नागरिकांना पुरातून बाहेर काढणे, अडकलेल्या नागरिकांना मदत पोहोचवणे, असे काम केले.
पाण्याचा प्रवाह हा भयानक होता. अनेक पातळ्यांवर आम्हाला तोंड द्यावे लागत होते. कधी कधी पाण्यात मोटरबोट बंद पडायची. कधी अन्य अडचणी येत होत्या. मात्र, आम्ही कधीच डगमगलो नाही.
या पुराशी सामना करताना संवादाचा आभाव जाणवत होता. अनेकवेळा एकाच कुटुंबाला मदत पोहोचवणे. पुरातून बाहेर काढणे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारे फोन यामुळे मदत केलेल्या किंवा वाचवलेल्या कुटुंबाच्या घरापर्यंत दोन-दोन वेळा चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे खूप अडचण येत होती. या गोष्टी लक्षात आल्यानंतर मदत पोहेचवणे, रेस्क्यू करणे यासाठी शहरातील हिराबाग, स्टेशन चौक याठिकाणी केंद्र बनवले. यामध्ये नोंद ठेवण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे बचाव आणि मदत कार्य करणे सोपे झाले, असे दत्ता पाटील सांगतात.
'त्या' वृद्ध महिलेला मिळाले जीवदान -
सांगलीवाडी येथील एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला होता. पुराच्या विळख्यात असलेल्या सांगलीवाडीतून त्या वृद्ध महिलेला उपचारासाठी कसे घेऊन जायचा? हा प्रश्न होता. कारण त्या महिलेच्या घरापर्यंत मोटार बोट जाऊ शकत नव्हती. त्यामुळे त्याठिकाणी आम्ही कयाक (फ्लोटिंग) बोट घेऊन गेलो. त्या बोटीवर वृद्ध महिलेस स्ट्रेचर वर जसे झोपवले जाते, तसे घेऊन आयर्विन पुलावर आणण्यात आले. त्यानंतर झोळीतून टिळक चौकातून मिल्ट्रीच्या बोटमध्ये टाकून हिराबाग चौकापर्यंत नेले. त्यामुळे त्या वृद्ध महिलेवर वेळेत उपचार झाले आणि तिचा जीव वाचला. त्यानंतर पुरात कयाक बोटीचा वापर करत रुग्ण, वयोवृद्ध व्यक्तींना वाचविण्याचे काम सुरू केले, असेही दत्ता पाटील सांगतात.
रात्रंदिवस बचाव कार्य सुरूच -
मिल्ट्री, नेव्ही आणि एनडीआरएफचे पथक सांगलीत दाखल झाले होते. मात्र, त्यांना परिसर ओळखीचा नव्हता. त्याठिकाणी जायचे कसे, काय अडथळे आहेत, अशा गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या. त्यामुळे रॉयल कृष्णाच्या सर्व सदस्यांनी या पथकाला मार्ग दाखवण्याचे काम केले. तसेच त्यांच्यासोबतच बोटींच्या माध्यमातून रेस्कू ऑपरेशन सुरू ठेवले. मिल्ट्री, नेव्ही आणि एनडीआरएफ हे दिवस उजाडल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत बचावकार्य करत होते. पण, कृष्णा रॉयल कृष्णाचे काम सायंकाळी ६नंतर पण सुरूच असायचे. हे करत असताना महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पूर्ण विश्वास दाखवला. त्यामुळे बचावकार्य शक्य झाल्याचे दत्ता पाटील सांगतात.
...तर शेकडो परप्रांतीयांचा बुडून मृत्यू झाला असता -
पुराचे पाणी वाढल्यानंतर एसटी स्टँड, कोल्हापूर रोड व सर्व परिसर पाण्याखाली जात होता. रॉयल कृष्णाचे सद्स्य पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासोबत त्या परिसरात बचाव कार्य करायला गेले. साधारण सायंकाळची वेळ होती. कोल्हापूर रोडवरील साधना पेट्रोल पंपसमोर निर्माणाधीन असणाऱ्या एका इमारतीवर नजर गेली. अंधार पडत असल्याने लांबून कोणीच दिसत नव्हते. मात्र, संशय आल्याने पाण्यात उतरत इमारतीजवळ पोहोचलो. मात्र, कोणीही दिसत नव्हतं. शेवटी आतमध्ये जाऊन पाहिले असता एका खोलीत सुमारे ३५ बिहारी परप्रांतीय कुटुंब होते. पाणी कमी होईल, या आशेवर ते कुटुंबीय इमारतीमध्येच राहण्याचा हट्ट करत होते. मात्र, जबरदस्तीने त्या सर्वांना रात्री ८ वाजेपर्यंत बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी पोहोचले त्यावेळी ती संपूर्ण इमारत पाण्याखाली बुडाली होती. वेळीच त्या कामगार आणि कुटुंबांना बाहेर काढले म्हणून बरे झाले, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती, असे रॉयल कृष्णाचा सदस्य अमोल बोळाजने सांगितले.
...अन् बाळाला मिळाला जन्म -
पुराचे पाणी वाढले होते. सगळीकडे रॉयल कृष्णाची टीम मदत करण्यात व्यग्र होती. सर्व सदस्य एका ठिकाणी फूड पाकिटांचे वाटप करत होते. रात्रीची वेळ होती. त्यावेळी रॉयल कृष्णाच्या टीमला फोन आला. सांगलीवाडी याठिकाणी प्रताप हेगडे यांचे कुटुंब अडकले होते. त्याठिकाणी असणाऱ्या गरोदर महिलेला उपचारासाठी घेऊन जाणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. फूड वाटप सोडून निघालो. पाणी खूप वाढले होते. पण जाणे खूप गरजेचे होते. तसेच त्या गरोदर महिलेला प्रसूती वेदनाही सुरू झाल्या होत्या. पण ती महिला ज्या ठिकाणी राहत होती, तिथे मोटरबोट घेऊन जाणे अशक्य होते. त्यामुळे मग आम्ही कयाक बोट घेऊन पोहोचलो. ज्या घरात राहत होत्या, तिथे जवळपास 6 फुट इतके पाणी होते. त्या दुसऱ्या मजल्यावर होत्या. जीवाची पर्वा न करता तिथे पोहचलो होतो. मग कयाक बोटमधून जीव मुठीत धरून त्यांना घेऊन निघालो. जवळपास पाण्यातून चार किलोमीटर अंतर कापत सुखरूप हिराबाग चौक याठिकाणी पोहोचलो. त्यानंतर महिलेवर उपचार करण्यात आले. रात्रीच्या सुमारास तिची प्रसूती झाली आणि तिने गोंडस बाळाला जन्म दिला, असे रॉयल कृष्णाचे सदस्य प्रतीक सांगतात.
2019मधील ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात अनेकांना रॉयल कृष्णा बोट क्लबच्या माध्यमातून जीवदान मिळाले. त्यामुळे महापुराच्या आठवणी कटु आठवणींमध्ये रॉयल कृष्णा बोट क्लबच्या मदतीच्या आठवणी सांगलीकरांच्या मनात कायमच्या घर करून राहणार हे नक्की.