सांगली - ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव मुठीत घेऊन उपचार घेणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक रुग्णांसाठी आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी 'ऑक्सिजन दूत' बनून मध्यरात्री मदत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरात्री सांगलीसाठी ऑक्सिजन टँकर पाठवल्याचे फोनवरून सांगताच स्वतः टँकर रिकामे करून घेण्याचा सूचना रोहित पाटील यांनी दिल्या आणि रात्रभर ऑक्सिजन उतरवून, रुग्णालयात पोहचवण्याचे काम केले आहे.
ऑक्सिजनचा होत आहे तुटवडा
सध्या सांगली जिल्ह्यात ऑक्सिजनचा गेल्या काही दिवसांपासून मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे.अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याच्या घटना समोर येत आहेत,शनिवारी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या अनेक खाजगी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. थोड्या प्रमाणात असणारा ऑक्सिजन कमी-अधिक प्रमाणात रुग्णांना देऊन रुग्णांच्यावर उपचार सुरू होते.अत्यंत नाजूक परिस्थिती शनिवारी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात निर्माण झाली होती.तर तालुक्यात ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांचे प्रयत्न सुरू होते.रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
हेही वाचा -औरंगाबाद : कोरोनामुळे 9 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, आतापर्यंत चार बालकांनी गमावला जीव