सांगली - सरसकट कर्जमाफी, उसाला दर आणि शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तर ठिकठिकाणी रस्ता रोका आंदोलन करण्यात आले आहे.
हेही वाचा - जेसीबीने फुलांचा वर्षाव करत राज्यमंत्री विश्वजीत कदमांचे जंगी स्वागत!
सांगली नजीकच्या इस्लामपूरमधील लक्ष्मी फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली-इस्लामपूर मार्गावर ठिय्या देत रस्ता रोखून धरला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, उसाला योग्य भाव द्यावा, तसेच शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तर या रस्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली.