सांगली - कंटेन्मेंट झोन असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये तोडफोडीचा प्रकार घडला आहे. या भागात २३ कोरोना रुग्ण सापडल्याने महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. संपूर्ण परिसर सील करण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी लावलेले पत्र्याचे बॅरिकेट्स उखडून टाकत विरोध केला. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सांगली शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये शुक्रवारी एकाचवेळी कोरोनाचे 23 रुग्ण आढळले. मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने महापालिका प्रशासनाने इंदिरानगर परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केला. त्यानंतर संपूर्ण परिसरात औषध फवारणी करून एक किलोमीटर क्षेत्रात पत्र्याचे बॅरिकेट्स लावून सील केला. हा भाग 28 दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून राहणार असल्याने स्थानिक नागरिकांनी संपूर्ण परिसर सील करण्याला तीव्र विरोध केला. पालिका प्रशासनाच्यावतीने लावण्यात आलेले पत्र्याचे बॅरिकेट्स उघडून फेकले. ज्या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत, त्या नागरिकांची घरे आणि आजूबाजूचा थोडा परिसर सील करण्यात यावा, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. त्यामुळे या ठिकाणी गोंधळ उडाला होता.
या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगरमध्ये मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका अधिकारी, नागरिक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. ज्या घरात कोरोना रुग्ण आढळले आहेत, तोच भाग सील करण्याबाबत तोडगा निघाला. त्यानंतर काही वेळात येथील वातावरण शांत झाले.
कोरोना अँटीजेन टेस्टलाही विरोध -
इंदिरानगरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने पालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांची अँटीजेन चाचणी सुरू करण्यात आली. येथील नागरिकांनी त्यालाही विरोध दर्शवला आहे. पालिकेच्या टेस्टवर आक्षेप घेत नागरिकांनी टेस्ट करून न घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे या ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या कोरोना अँटीजेन टेस्टची मोहीम थांबली.